मुंबई : वृत्तसंस्था
शिवसेना (Shiv Sena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली असून त्यांच्या विरोधात भारतीय दंडविधान कलम ४९९ आणि ५०० अंतर्गत शिवडी न्यायालयाकडून अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. आपली बदनामी केल्याप्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी संजय राऊतांविरोधात शिवडी कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यानंतर समन्स बजावूनही राऊत कोर्टात हजर झाले नव्हते. त्यामुळे आता त्यांच्यावरोधात जामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे.
संजय राऊत यांनी मेधा सोमय्या यांच्यावर १०० कोटींचा शौचालय घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. मीरा भाइंदर शहरात १५४ सार्वजनिक शौचालये बांधण्यात आली आहेत. त्यातील १६ शौचालये बांधण्याचे कंत्राट मेधा सोमय्या यांच्या युवक प्रतिष्ठानला मिळाले होते. बनावट कागदपत्रे सादर करून हे कंत्राट मिळवले. सार्वजनिक शौचालयांची उभारणी आणि देखभालीच्या प्रकल्पात युवा प्रतिष्ठान या संस्थेने १०० कोटी रुपयांचा घोटाळा केला होता, असा आरोप संजय राऊत यांनी केला होता.
मात्र हा आरोप एका महिलेवर दबाव टाकण्यासाठी आहे. त्यांच्याकडे याचा एकही पुरावा नाही, असा दावा सोमय्या यांनी केला होता. याविरोधात मेधा सोमय्या यांनी १८ मे रोजी पोलिसांत धाव घेतली होती. कोणताही पुरावा नसताना राऊतांकडून बदनामीकारक वक्तव्ये केली जात असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली होती. मात्र पोलिसांनी कोणतीही कारवाई न केल्याने त्यांनी शिवडी न्यायालयात धाव घेतली होती. संजय राऊत यांना आता १८ जुलै रोजी होणाऱ्या पुढील सुनावणीला उपस्थित राहून जामीन घ्यावा लागणार आहे.




















