बीड :- शिवसेनेसोबत बंडखोरी करणाऱ्या आमदारानंतर आता गावपातळीवरही शिवसेनेत गळती लागली आहे. बीड जिल्ह्यातील शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख सचिन मुळुक यांनी शिवसेनेला रामराम ठोकला असून शिंदे गटात सहभागी होण्याचा निश्चय केला असून बीड जिल्ह्यातील जवळपास सर्वच शिवसेना पदाधिकारी आणि माझ्या संपर्कात असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले आहे.
शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख सचिन मुळुक यांनी पत्रकार परिषद घेत आपण शिवसेना पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याची माहिती दिली. मुळुक यांच्या राजीनाम्यामुळे भविष्यात शिवसेनेला मोठे खिंडार पडण्याची शक्यता आहे. तर यावेळी शिवसेना संपर्कप्रमुख आनंद जाधव हे अवैध धंद्यात सामील आहेत. तर उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिलेल्या दिवशी चंद्रकांत खैरे यांनी द्विगुणित आनंद झाल्यासारखा डान्स केला, असा गंभीर आरोप सचिन मुळक यांनी केला आहे.
मुळूक म्हणाले, शिवसैनिक म्हणून आमची भूमिका स्पष्ट करत आहोत. मागील २५ वर्षांपासून शिवसेनेत दिवसरात्र काम केले. माझ्यासह बीडमधील अनेकांनी हाच निर्णय घेतला आहे. आगामी काळात ते देखील हाच निर्णय घेतील. बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांच्या विचारावर आम्ही पुढची वाटचाल करणार आहोत. आम्ही शिवसेनेत आहोत, शिवसैनिक आहोत. त्यांचीच शिवसेना अनेक शिवसैनिकांना मान्य आहे. जिल्ह्यातील ७० टक्के आजी-माजी पदाधिकारी संपर्कात आहेत. त्यांच्यासोबत बैठक झाली असून लवकर ते देखील निर्णय घेणार असल्याचे मुळूक म्हणाले.
दरम्यान, संपर्कप्रमुख आनंद जाधव संपर्क प्रमुख नव्हे तर दलाली करणारे अन अवैध धंदे करणारे आहेत. त्यांची माजलगाव येथील वाळूच्या धंद्यात भागीदारी आहे, त्याची पक्षाने चौकशी केली पाहिजे. तर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी संभाजीनगरचे नामकरण झाल्याचा आनंद साजरा केला. मात्र त्यांना याचा नव्हे तर मुख्यमंत्री पदावरून उद्धव ठाकरे यांचा पायउतार झाल्याचा आनंद जास्त झाला, म्हणून त्यांनी दिलखुलास डान्स केला, असा गंभीर आरोपही सचिन मुळूक यांनी केला.





















