मुंबई : वृत्तसंस्था
राजकीय सत्तासंघर्षानंतर अखेरीस शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde )यांच्यासोबतचे एकूण ५० आमदार आणि भाजपने हातमिळवणी करून राज्यात सत्ता स्थापन केली. त्यात हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकत्र येत मनसेच्या(MNS) एका आमदारानेही विधानसभेत भाजप आणि शिंदे सरकारच्या बाजूने मतदान केले. त्यानंतर आता भाजप (BJP) आणि मनसेची जवळीक वाढल्याचे काही लपून राहिलेले नाही. पण शिवसेनेत नाराज असलेले आमदार बंडखोरी करुन शिंदे गटात सामील झाल्यानंतर आता थेट शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर (Sada Sarvankar)यांनी आज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीमुळे दादर परिसरात राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात सामील झालेले दादरचे आमदार सदा सरवणकर यांनी आज मनसेप्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी सदा सरवणकर यांचे पुत्र समाधान सरवणकर देखील उपस्थित होते. राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर सदा सरवणकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राज ठाकरे हे हिंदूजननायक असल्याचे सदा सरवणकर यांनी आवर्जून सांगितले. बाळासाहेबांच्या शिवसेनेची आणि मनसेची भूमिका एकच असल्याचेही ते म्हणाले. तब्येत नाजूक असताना देखील राज ठाकरेंनी मला भेटण्यासाठी वेळ दिला. त्यांचा मी नेहमीच आदर करतो, असे सदा सरवणकर म्हणाले.





















