मुंबई : वृत्तसंस्था
एकनाथ शिंदे यांच्यासह काही आमदारांनी केलेल्या बंडखोरीमुळे शिवसेना (Shiv Sena) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले. एवढेच नाही तर आता शिवसेनेकडे केवळ १५ आमदार शिल्लक असल्याने पक्षवाढीचे मोठे आव्हान उद्धव ठाकरेंपुढे उभे ठाकले आहे. अशातच राज्यात शिंदे-भाजप सरकार (Shinde-BJP Goverment) स्थापन झाले असून मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदे विराजमान झाले आहेत. यासर्व घडामोडीवरून आता उद्धव ठाकरे संघटनेत चांगलेच सक्रिय झाले आहेत. उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेना (Shiv Sena) भवनात राज्यातील शिवसेना जिल्हाप्रमुखांची बैठक बोलावली होती. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी आक्रमकपणे आपली भूमिका स्पष्ट करत सत्ताधारी शिंदे गट आणि भाजपला आव्हान दिले आहे.
लढायचे असेल तर तुम्ही सर्वानी आमच्या सोबत राहा. शिवसेनेला संपवण्याचे प्रयत्न भाजपकडून सुरु आहे. आपण जनतेच्या न्यायालयात जाऊ, जर आपण चुकत असेल, तर जनता आम्हाला घरी बसवेल. तुम्ही चुकत असाल, तर जनता तुम्हाला घरी बसवेल. मात्र, हिंमत असेल तर भाजपने मध्यावधी निवडणुका घ्याव्यात, असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी दिले आहे.
विधानसभा मनमानी पद्धतीने चालवणे हा घटनेचा अपमान असल्याचेही उद्धव ठाकरे म्हणाले. घटना तज्ज्ञांना विनंती आहे आपण घटनातज्ञ आहात. सध्या जे सुरु आहे ते घटनेला धरून सुरु आहे की डॉ बाबासाहेब आंबेडकरांची घटना मोडण्याचा प्रकार सुरु आहे त्याबाबत आपली भूमिका मांडावी. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात महाराष्ट्रात जे सुरु आहे त्याबाबत सर्वाना सत्य बोलू द्या. विधानसभा मनमानी पद्धतीने चालवणे हा घटनेचा अपमान आहे, अशी उद्धव ठाकरे म्हणाले. दरम्यान, शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्री आणि विधानपरिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला. यानंतर त्यांनी पुन्हा पक्ष संघटनेवर लक्ष केद्रिंत केले आहे. यामुळे त्यांनी थेट शिवसैनिकांशी बैठका आणि सामान्य शिवसैनिकांशी भेटीचा सपाटा लावला आहे. याच रणनीतीचा भाग म्हणून त्यांनी आज शिवसेना भवनात जिल्हाप्रमुखांची बैठक बोलावली होती. या बैठकीत त्यांनी आपली भूमिका मांडत जिल्हाप्रमुखांना मार्गदर्शन केले.





















