जळगाव मिरर / ३० मार्च २०२३
मुक्ताईनगर शहरातील एका १० वर्षीय बालक वॉल कंपाऊंडचे गेट उघडताना गेट तुटून पडल्याने बालक गंभीर जखमी झाला होता दोन दिवस डॉक्टरही त्याला वाचवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले पण २९ रोजी या बालकाचा दुर्देवी मृत्यू झाल्याने तालुक्यासह शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेली माहिती अशी कि, मुक्ताईनगर शहरातील तहसील कार्यालय परिसरात असलेल्या एका १० वर्षीय बालकाच्या अंगावर वॉल कंपाऊंडचे वजनदार गेट उघडताना अचानक गेट तुटून पडून बालक गंभीर जखमी झाल्याची घटना दिनांक २८ मार्च मंगळवार रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. डॉ.जगदीश पाटील यांच्याकडे प्राथमिक उपचार करून जखमी बालकास पुढील उपचारार्थ जळगाव येथे हलवण्यात आले होते. बालक ओम प्रमोद भारंबे गंभीर जखमी असताना त्याची मृत्यूची झुंज सुरू होती. डॉक्टरही त्याला वाचवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करीत होते . परंतु ओमची मृत्यूशी सुरु असलेली झुंज संपून २९ मार्च बुधवार रोजी दुपारी तीन वाजून 56 मिनिटांनी त्याने अखेरचा श्वास घेतला. अकाली निधन झाल्याचा मोठा आघात पित्यावर असतानाही प्रमोद हरी भारंबे यांनी आपल्या लहानग्या मुलाचे नेत्र दान देण्याचा निर्णय घेऊन बालकांच्या स्मृती जिवंत ठेवल्या आहेत. संकटात ही अवयव दानाची समय सूचकता ठेवून भारंबे कुटुंबियांनी समाजासमोर एक आदर्श ठेवला आहे.
