
जळगाव मिरर | १७ जून २०२६

बेदरकारपणे भरधाव वेगाने कार चालवणाऱ्या चालकामुळे रविवारी सायंकाळी भीषण अपघात घडला. कारने प्रथम समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली आणि त्यानंतर चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने कार थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानात घुसली. या दुहेरी अपघातात आत्माराम बाबूराव ढिवरे (वय ५३, रा. मोरगाव बु., ता. रावेर) यांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य पाच जण गंभीर जखमी झाले. या प्रकरणी सावदा पोलिस ठाण्यात कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवारी सायंकाळी सावदा नजीक घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सरफराज समशेर तडवी हा आपल्या कारने वाघोदा बुद्रूकहून सावद्याकडे जात होता. यावेळी त्याने भरधाव व बेदरकारपणे वाहन चालवत सावद्याहून वाघोद्याकडे जाणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील शेख जकरीया शेख जहीर, शेख रिजवान शेख रियाज आणि मुदस्सर शेख जमीर (रा. चिनावल) हे जखमी झाले.
दुचाकीला धडक दिल्यानंतर कार चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि कार थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या एका दुकानात घुसली. त्यावेळी दुकानाजवळ उभे राहून पाणी पीत असलेले आत्माराम ढिवरे, त्यांची पत्नी मंदाबाई ढिवरे आणि मुलगा मनोहर ढिवरे यांना कारने जोरदार धडक दिली.
या अपघातात आत्माराम ढिवरे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर गंभीर जखमी झालेल्या मंदाबाई ढिवरे आणि मनोहर ढिवरे यांना तातडीने बऱ्हाणपूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दुसरीकडे, दुचाकीवरील जखमी तिघांवर जळगाव येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, रावेर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैभव गिरी यांनी मृतदेहाचे शवविच्छेदन केले. या प्रकरणी जखमी मनोहर ढिवरे (वय २५) यांनी सावदा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यावरून कार चालक सरफराज समशेर तडवी याच्याविरुद्ध निष्काळजीपणे वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. या भीषण अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून भरधाव वाहनचालकांवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.




















