
जळगाव मिरर | ८ जून २०२६

यावल तालुक्यातील आमोदा येथे रविवारी पहाटे घडलेल्या दुर्दैवी अपघातात १३ वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. घरातील धान्याच्या कोठीवर ठेवलेला टीव्ही संच झोपेत असताना डोक्यावर पडल्याने नाजमीन मोहम्मद इसहाक पिंजारी हिचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, नाजमीन पिंजारी ही शनिवारी सकाळी आपल्या आजीच्या घरी गेली होती. दिवसभर आजीकडे राहिल्यानंतर ती रात्री तेथेच झोपली होती. रविवारी पहाटे सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास घरात ठेवलेल्या रिकाम्या धान्याच्या कोठीला तिचा धक्का लागला. या कोठीवर टीव्ही संच ठेवण्यात आला होता. धक्का लागताच टीव्ही संच थेट नाजमीनच्या डोक्यावर कोसळला.
या अपघातात तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव सुरू झाला. घटनेनंतर कुटुंबीयांनी तातडीने तिला उपचारासाठी सावदा येथील रुग्णालयात दाखल केले. प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी तिला भुसावळ येथे हलविण्यात आले. मात्र, तेथील डॉक्टरांनी तपासणीनंतर नाजमीनला मृत घोषित केले.
या घटनेमुळे पिंजारी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून आमोदा गावात शोककळा पसरली आहे. चिमुरड्या मुलीच्या अकाली निधनाने नातेवाईकांसह ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, या प्रकरणी मुलीचे वडील मोहम्मद इसहाक पिंजारी यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.




















