जळगाव मिरर | २४ फेब्रुवारी २०२६
सामाजिक प्रबोधन, स्वच्छता आणि अंधश्रद्धा निर्मूलनाचा संदेश देणारे थोर समाजसुधारक राष्ट्रसंत श्री गाडगे बाबा यांची १५० वी जयंती मेहरुण येथे मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावात साजरी करण्यात आली. कार्यक्रमात परिसरातील बहुसंख्य समाजबांधव आणि भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
संत गाडगे बाबा जयंतीनिमित्त सकाळी रामेश्वर कॉलनी येथील स्वामी समर्थ केंद्रातून संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली. टाळ-मृदुंगाच्या गजरात, भजन-कीर्तन आणि घोषणांनी वातावरण भक्तिमय झाले होते. हातात फलक घेऊन स्वच्छता, समाजसेवा आणि व्यसनमुक्तीचा संदेश देण्यात आला. मिरवणुकीचा समारोप मेहरुण तलाठी कार्यालय येथे झाला.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. काही वक्त्यांनी आपल्या मनोगतातून गाडगे बाबा यांच्या कार्याचा आढावा घेत, त्यांच्या विचारांचे आजच्या काळातील महत्त्व अधोरेखित केले. समाजात स्वच्छता, समता आणि शिक्षणाचा प्रसार करण्याचे आवाहन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी संत गाडगे बाबा उत्सव समिती तसेच मेहरुण परिसरातील सर्व समाजबांधवांनी परिश्रम घेतले. विशेष म्हणजे, महिला वर्गाचा सहभाग लक्षणीय होता. त्यांच्या उत्स्फूर्त उपस्थितीमुळे कार्यक्रमाला अधिक रंगत आली. एकूणच, राष्ट्रसंत गाडगे बाबा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त आयोजित हा कार्यक्रम मेहरुणमध्ये प्रेरणादायी आणि उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या संपन्न झाला.




















