
जळगाव मिरर | १८ मे २०२५
देशातील हैदराबादमधील चारमिनारजवळील एका इमारतीला लागलेल्या भीषण आगीत १७ जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. तर काही जण गंभीर जखमी आहेत. आग लागलेली इमारत हैदराबादच्या मीर चौक परिसरात आहे. पोलिस आणि अग्निशमन विभागाच्या प्राथमिक तपासानुसार, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा संशय आहे.
अग्निशमन विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, त्यांना सकाळी ६.३० च्या सुमारास फोन आला. यानंतरच त्यांची टीम घटनास्थळी पोहोचली. अग्निशमन विभागाच्या म्हणण्यानुसार, त्यांना सकाळी ६:३० वाजता आगीची माहिती मिळाली. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ११ गाड्या घटनास्थळी रवाना करण्यात आल्या. घटनास्थळी १० रुग्णवाहिकाही उपस्थित होत्या. त्यामुळे जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी यांनी या घटनेवर दुःख व्यक्त केले आहे. ते म्हणाले की, अशा घटना खूप दुःखद आहेत. मी केंद्र सरकार आणि पंतप्रधान मोदींशी बोलेन आणि या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेन. त्याचवेळी, मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी या घटनेवर दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी अधिकाऱ्यांना मदतकार्याला गती देण्यास आणि जखमींना सर्वोत्तम उपचार मिळावेत याची खात्री करण्यास सांगितले आहे.
पंतप्रधान मोदींनीही या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केले आहे. या घटनेबाबत पंतप्रधान मोदींनी एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘आगीत झालेल्या मृत्यूंमुळे त्यांना खूप दुःख झाले आहे. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले त्यांच्याबद्दल संवेदना. जखमींना लवकर बरे होण्यासाठी मी प्रार्थना करतो. प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून २ लाख रुपयांची मदत दिली जाईल. तर जखमींना ५०,००० रुपये दिले जातील.’