
जळगाव मिरर | २० जून २०२६

यावल तालुक्यातील किनगाव बुद्रुक येथील रहिवासी एका २० वर्षीय तरुणाने यावल शहरातील काकाच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, यावल तालुक्यातील किनगाव बुद्रुक येथील रहिवासी शेख जयैद शेख अख्तर (वय २०) हा तरुण शुक्रवारी यावल शहरातील आठवडे बाजार भागातील सईद पुरा येथे त्याचे काका शेख हारुण शेख रशीद यांच्या घरी आला होता. दरम्यान, त्याने त्याच्या आजीला चहा तयार करण्यास सांगितले आणि तो घराच्या वरच्या मजल्यावर गेला. बराच वेळ झाला तरी तो चहा पिण्यासाठी खाली न आल्याने या तरुणाला बोलावण्यासाठी त्याची आजी वरच्या मजल्यावर गेली.
त्यावेळी त्यांना वरील मजल्यावर शेख जयैद शेख अख्तर याने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तातडीने त्याला कुटुंबियाच्या मदतीने तेथून यावल ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मयत घोषित केले. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात शेख हारून यांनी दिलेल्या माहितीवरुन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.




















