
जळगाव मिरर | २३ मे २०२६
चोपडा शहरातील नवीन तहसील कार्यालयाच्या परिसरात गावठी कट्टा बाळगून फिरणाऱ्या २२ वर्षीय तरुणाला चोपडा शहर पोलिसांनी धाडसी कारवाई करत रंगेहात ताब्यात घेतले. या कारवाईत गावठी कट्टा, जिवंत काडतूस व मोबाईल असा सुमारे एक लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील नवीन तहसील कार्यालयाच्या मागील बाजूस असलेल्या कान्हा वाशिंग सेंटरजवळ एक तरुण गावठी कट्टा घेऊन फिरत असल्याची गुप्त माहिती चोपडा शहर पोलिसांना प्राप्त झाली होती. माहितीची खातरजमा करून पोलिसांनी तत्काळ सापळा रचत संशयितावर नजर ठेवली. दरम्यान, पोलिसांनी दुर्गेश दिवाण पाटील (वय २२, रा. चोपडा) यास ताब्यात घेतले असता त्याच्या झडतीमध्ये एक गावठी कट्टा, एक जिवंत काडतूस तसेच मोबाईल फोन आढळून आला. पोलिसांनी सदर साहित्य जप्त करत अंदाजे एक लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल नीलेश वाघ यांच्या फिर्यादीवरून आरोपी दुर्गेश पाटील याच्याविरोधात चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस निरीक्षक पवन देसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक एकनाथ भिसे, दीपक विसावे, संतोष पारधी, ज्ञानेश्वर जवागे, संदीप भोई, जगन्नाथ पाटील, विनोद पाटील, आकाश पाटील व नीलेश वाघ यांच्या पथकाने केली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एकनाथ भिसे करीत आहेत.





















