जळगाव मिरर | २६ जुलै २०२४
महाराष्ट्र शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागामार्फत जळगाव जिल्हयासाठी सर्व 19 नगरपालिकांच्या अग्निशमन विभागास फायर फायटींग बाईकचे वितरण आज दि.25/07/2024 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ग्रामविकास मंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आ. चंद्रकांत पाटील, आ. किशोर पाटील, आ. मंगेश चव्हाण, आ. सुरेश भोळे, आ. लता सोनावणे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकीत, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नरवीर रावळ उपस्थित होते.
या कार्यक्रमांतर्गत सर्व नगरपालिकांचे अग्निशमन अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते. या सर्व अधिकारी कर्मचारी यांना यावेळी या यंत्रासह सज्ज असलेल्या दुचाकीच्या सहाय्याने आग विझविण्याचे प्रात्यक्षिक दाखविले. या दुचाकीचे महत्व खालील प्रमाणे आहे ‘ वॉटरमिस्ट आणि सीएएफ बाइक माउंटेड फायर एक्टिंग्विशर’ ही सर्वात आधुनिक आणि कॉम्पॅक्ट फायर कॉम्बॅट सिस्टीम असल्याने महत्त्वाच्या ठिकाणी होणारे मोठे नुकसान टाळता येते आणि आग फार कमी वेळात विझवता येते अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी यावेळी दिली. या यंत्रणा प्राथमिक स्वरुपाच्या किंवा मध्यम स्वरुपाच्या आगीवर प्रभावीपणे वापरण्यांत येतात. या यंत्रणेमध्ये कमीत कमी पाण्याचा वापर हा पाण्याच्या सुक्ष्म कणांच्या (Water Mist) रुपाने आगीवर केला जातो, जेणेकरुन आगीची उष्णता ही पाण्याचे बाष्पीकरण करण्यासाठी होवून आग थंड करण्याची प्रक्रिया जलद गतीने होते. तसेच पाण्याचे बाष्पीभवन झाल्याने आगीच्या सभोवताली असलेल्या प्राणवायुचा (Oxygen) पुरवठा कमी होवून आग विझविण्यास मदत असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
यंत्रणा एक किंवा दोन व्यक्ती हाताळू शकतात कार्यालये, शाळा इत्यादी सार्वजनिक इमारतीत याचा प्रभावीपणे उपयोग होतो. तेथील कर्मचा-यांना किमान प्रशिक्षण दिल्यास अग्निशमन दल घटनास्थळी येईपर्यंत आग काबूत येवू शकते किंवा विझूही शकते. या यंत्रणेच्या वापरामुळे आगीच्या ठिकाणी पाण्यामुळे होणारे नुकसान कमी करणे सहज शक्य आहे. ही ‘बाईक माऊंटेड मिस्ट टेक्नॉलॉजी’ गर्दीच्या भागात प्रथम प्रतिसाद देणारे म्हणून ऑपरेशन सुलभ करणारे ठरणार आहे. जिल्ह्यात सध्या 27 हे दुचाकीवर बसविलेले अग्निशमन यंत्र देण्यात आले आहेत