जळगाव मिरर | १६ डिसेंबर २०२३
प्रत्येक परिवारात लग्न झाल्यावर छोटे मोठे वाद होत असतात, पण नुकतेच बीड जिल्ह्यात अशाच एका परिवारात झालेला वाद कुठेही न मिटता त्यातून एक दुर्देवी घटना घडली आहे. सासूरवाडीत मुलीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आलेल्या जावयाने बायकोसह सासरकडील मंडळींच्या त्रासाला कंटाळून विषारी द्रव्य प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील बाभळगाव याठिकाणी घडली आहे. याप्रकरणी सासरच्या मंडळींविरोधात दिंद्रुड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील लोणी या गावातील नितीन विनायक शेळके (वय ३२) याचा विवाह माजलगाव तालुक्यातील श्रीक्षेत्र बाभळगाव येथील रूपाली रुस्तुम सुरवसे हिच्यासोबत २०२० साली झाला होता. 6 महिन्यांच्या सुखी संसारानंतर पती-पत्नीमध्ये वाद सुरू झाला. पत्नी रुपालीने पती नितीकडे वेगळे राहण्यासाठी तगादा लावला होता. तसेच शेत वाटून घे म्हणून पत्नी व सासरची मंडळी त्याला वारंवार मानसिक त्रास द्यायची.
दरम्यान, दुसऱ्या बाळंतपणासाठी रुपाली माहेरी बाभळगाव येथे आली होती. त्यांची मोठी मुलगी नेहा हिचा वाढदिवस असल्याने नितीन सासरवाडीला आला होता. यावेळी पत्नीने त्याच्याशी किरकोळ कारणावरून वाद घातला. तसेच त्याला पत्नी रूपाली, सासू आशाबाई रुस्तुम सुरवसे, सासरा रुस्तुम सुरवसे व मेहुणा पवन रुस्तुम सुरवसे यांनी मानसिक त्रास दिला. त्यामुळे नितीनने सासरवाडीतच विषारी द्रव प्राशन करून आत्महत्या केली. याप्रकरणी नितीनचा भाऊ प्रशांत विनायक शेळके यांच्या फिर्यादीवरून सासरच्या मंडळीविरोधात बीडच्या दिंद्रुड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.