जळगाव मिरर | १६ डिसेंबर २०२४
भुसावळ शहरातील सतारा भागातील नारायण कॉम्पलेक्सजवळील पालिकेच्या शौचालयात तीन चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवत सुनील यशवंत पाटील यांच्याजवळील ४५ हजार रुपये रोख व मोबाईल असा ६२ हजारांचा ऐवज लुटल्याची घटना २ डिसेंबरला सकाळी घडली. या प्रकरणी शहर पोलिसांत १३ डिसेंबरला अर्थात ११ दिवसानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील जुना सतारा भागातील मरीमाता मंदिरामागील सुनील यशवंत पाटील यांना तीन जणांनी चाकूचा धाक दाखवत नारायण कॉम्पलेक्स जवळील पालिकेच्या शौचालयात नेले या वेळी दोन जणांनी त्यांचे हात पकडले तर एकाने चाकू दाखवत आरडा-ओरड केल्यास चाकू मारून देईल, अशी धमकी दिली. त्यानंतर चोरट्यांनी सुनील पाटील यांच्या खिशातील ४५ हजारांची रोकड तसेच मोबाईल असा ६२ हजारांचा ऐवज घेऊन चोरटे पसार झालेत. याप्रकरणी सुनील पाटील यांनी १३ रोजी शहर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून तीन अनोळखी चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. शहर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक उध्दव डमाळे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. पोलीस उपनिरीक्षक इक्बाल अली इब्राहीम अली सय्यद हे या घटनेचा तपास करत आहेत