
जळगाव मिरर | 15 मे 2026
जामनेर तालुक्यातील मोहाडी येथील वैशाली सुनील मोरे (वय २०) या नवविवाहितेचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना घडली. गेल्या २० दिवसांपूर्वी मृत वैशालीचा विवाह मोहाडी येथील रहिवाशी सुनील बाळू मोरे यांच्याशी झाला होता. भडगाव तालुक्यातील बाळद हे वैशालीचे माहेर आहे. आपल्या नातेवाईकांच्या लग्न समारंभासाठी मंगळवारी त्या भर उन्हात दुचाकीवरून चोपडा येथे गेल्याचे सांगितले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी स्वयंपाक केल्यानंतर वैशालीला मळमळ होऊन चक्कर येऊ लागल्याने नातेवाईकांनी तात्काळ त्यांना नेरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथील डॉ. कोमल देसले यांनी त्यांची तपासणी केली असता त्यांच्यात उष्माघाताची लक्षणे दिसल्याने त्यांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी वैशालीला जळगाव येथील शासकीय रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला होता. परंतु रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच वैशालीची प्राणज्योत मालवली. लग्नानतर नव्या संसाराची स्वप्नं पाहणाऱ्या वैशालीच्या अशा एकाकी जाण्याने दोघं परीवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मृत वैशाली मोरे यांनी भर उन्हात दुचाकीवरून प्रवास केला होता. आपल्या घरी आल्यावर त्यांनी स्वयंपाक केल्यामुळे त्यांना उष्णतेचा संसर्ग झाला असावा. नेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तेव्हा मृत वैशालीच्या अंगात १०४ इतका ताप होता. अंगावर खूप जास्त सूज होती, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेश सोनवणे यांनी दिली.






















