जळगाव मिरर | २८ जुलै २०२४
लोकसभा निवडणुकीच्या निकाल लागल्यानंतर राज्यात विधानपरिषद निवडणूक मोठ्या उत्साहात झाली होती. त्यानंतर या निवडणुकीत महायुतीचे ०९ आणि महाविकास आघाडीचे ०२ उमेदवार निवडून आले होते. दरम्यान आज या सर्व ११ विजयी उमेदवारांनी आमदारकीची शपथ घेतली आहे. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी त्यांना शपथ दिली. विधान भवनातील विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात हा शपथविधी सोहळा पार पडला.
विधानपरिषदेची निवडणूक बिनविरोध होईल, असं सांगितलं जात होतं. मात्र, ऐनवेळी उद्धव ठाकरे यांनी मिलिंद नार्वेकर यांना उमेदवारी जाहीर करून या निवडणुकीत ट्विस्ट आणला. त्यामुळे निवडणूक घ्यावीच लागली. दरम्यान, निवडणुकीसाठी सत्ताधारी महायुतीने ९ उमेदवार उभे केले. तर विरोधी महाविकास आघाडीचे ३ उमेदवार रिंगणात उतरवले. त्यामुळे १२ वा उमेदवार कुणाचा विजयी होणार, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून होतं.
अखेर निवडणुकीत महायुतीचे सर्वच ०९ उमेदवार निवडून आले. तर महायुतीला केवळ २ जागांवर विजय मिळवता आला. शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार मिलिंद नार्वेकर आणि जयंत पाटील यांच्यात नेमका कोण विजयी होणार याची उत्कंठा लागून राहिली होती. अखेर, मिलिंद नार्वेकर यांच्या गळ्यात विजयाची माळ पडली निवडणुकीत काँग्रेसची ८ मतं फुटल्याचं दिसून आले होते.
या ११ आमदारांनी घेतली शपथ
पंकजा मुंडे – भाजप
योगेश टिळेकर – भाजप
अमित गोरखे – भाजप
परिणय फुके – भाजप
सदाभाऊ खोत – भाजप
भावना गवळी – शिंदे शिवसेना
कृपाल तुमाने – शिंदे शिवसेना
शिवाजी गर्जे – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
राजेश विटेकर – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
प्रज्ञा सातव – काँग्रेस
मिलिंद नार्वेकर – उद्धव ठाकरे पक्ष