
जळगाव मिरर / ३० ऑक्टोबर २०२२
राज्यात शिंदे व फडणवीस सरकारच्या कामावर विश्वास ठेवत विविध पक्षामधून राजकीय मंडळी शिंदे गट व भाजपात दाखल होत असल्याचे चित्र काही दिवसापासून दिसत आहे, जळगाव जिल्ह्यात नुकतेच मुक्ताईनगर येथे राष्ट्रवादीचे काही पदाधिकारी शिंदे गटात तर जामनेर येथील शहराध्यक्ष भाजपात दाखल झाल्याने राष्ट्रवादीला आता जिल्ह्यात दगा फटका होण्याचे चिन्ह वाढत असल्याचे वातावरण तयार होत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष जितेश ऊर्फ पप्पू पाटील यांनी नुकताच राज्याचे ग्रामविकास तथा क्रीडा व युवक कल्याणमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भाजपत प्रवेश केला. या वेळी पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. राष्ट्रवादीला पंधरा दिवसांतच पुन्हा एक धक्का बसला आहे. यापूर्वी राष्ट्रवादीचे नेते व माजी पंचायत समिती सदस्य रामलाल नाईक यांनीही आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह मंत्री महाजनांच्या उपस्थितीत भाजपत प्रवेश केला होता.
जितेश पाटील हे गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादीचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळखले जात होते. विरोधक म्हणून अनेक आंदोलनात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सहभाग घेतला असून, पक्षाच्या विविध कार्यक्रमात ते हिरिरीने सामील होत होते. येत्या पाच-सहा महिन्यावर जामनेर नगरपालिकेची निवडणूक होऊ घातली असून, पप्पू पाटील यांच्या प्रवेशाने भाजपला काहीअंशी का होईना, राजकीय बळ मिळणार असल्याचे समजते.




















