पाचोरा : प्रतिनिधी
मुलीला भेटण्यासाठी आलेल्या वडीला सोबत माहेरी पाठवण्यास नकार दिल्याने बापलेकीने डाव साधून पाण्यातून गुंगीचे औषध देत मध्यरात्री लोखंडी सळईने बेदम मारहाण करीत धिंगाणा घातल्याची घटना पाचोरा शहरातील कोंडवाडा गल्लीत घडली आहे. याप्रकरणी पाचोरा पोलिसात मुलाच्या वडिलांच्या फिर्यादीवरून बापलेकी विरुद्ध गुन्हा दाखल झाला असून अल्पवयीन विवाहितेची जळगाव येथील बालसुधार गृहात रवानागी केली आहे. विवाहितेच्या वडिलांना पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत पोलिस सूत्रांकडून प्राप्त माहिती अशी की, पाचोरा शहरातील कोंडवाडा गल्लीत राहणारे अर्जुन उखा पाटील यांचा मुलगा राहुल याचा विवाह अंतरजातीय वधू शोधून दि ९ मार्च २२ रोजी पाथरी ता. पाथरी जि. परभणी येथील युवतीशी झाला. सदर युवतीचे वडील साहेबराव सांडु मस्के मुळ रा. म्हसले साबळेवाडी ता. बदनापुर जि. जालना येथील मूळ रहिवासी आहे. विवाह झाल्यानंतर पत्नीस पाचोरा येथे घरी आणले. दि २५ मार्च २२ रोजी विवाहितेस करमत नसल्याने तिने वडिलांना बोलावून घेतले. आता मुलीला माहेरी घेऊन जातो असे साहेबराव मस्के याने जावई राहुव व अर्जुन पाटील यांना आग्रह केला. मात्र विवाहितेला पाठवत नाही असे म्हणून नकार दिल्याने याचा राग येऊन मुलीच्या वडिलांनी व मुलीने रात्रीच सासरच्या मंडळीचा काटा काढण्याचे ठरविले.
दि २७ रोजी रात्री विवाहितेने पाण्यातून पतीला व सासू – सासरे यांना गुंगीचे औषध दिले. मध्यरात्री १.३० वाजता अर्जुन उखा पाटील यांना अचानक जाग आली. सुनेने व तिच्या वडिलांनी लोखंडी गजाने पती राहुल, सासरे अर्जुन पाटील व सासू विजयाबाई यांना बेदम मारहाण केली. यावेळी मोठा गोंधळ उडाला असता शेजारील नागरिकांनी त्यांना जखमी अवस्थेत खाजगी रुग्णालयात दाखल केले. तर बाप लेकीला पोलिसांच्या स्वाधीन केले.
दरम्यान, सदर मुलगी ही अल्पवयीन असल्याने तिला जळगाव येथील बालसुधारगृह सुधारगृहात रवाना केली असून मुलीच्या वडिलांना पाचोरा पोलिसांनी अटक केली आहे. सदर साहेबराव मस्के यांनी सदर मुलीचा एकाच वर्षात चौथा विवाह लावण्यात आला असल्याचीही चर्चा परिसरात सुरू होती. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून सदर घटनेचा तपास पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक राहुल मोरे करीत आहेत. एजंटांमार्फत आंतरजातीय विवाह करून लाखो रुपयांची लूट करणारी टोळी राज्यात सक्रीय असल्याने यांच्या पासुन सावध राहण्याचे आवाहन पोलिस प्रशासनाने नागरिकांना केले आहे.
