जळगाव मिरर | २५ ऑक्टोबर २०२६
छावा मराठा युवा महासंघाच्या जळगाव जिल्हा उपाध्यक्षपदी ॲड. राजेश पावसे (मराठे), तर महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी सौ. नीलू इंगळे यांची नियुक्ती करण्यात आली. संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष अमोल कोल्हे यांच्या हस्ते दोघांना नियुक्तिपत्र प्रदान करण्यात आले.

ॲड. राजेश पावसे हे शिवसेनेचे महानगर उपाध्यक्ष असून, छावा मराठा युवा महासंघात ते यापूर्वी कायदेविषयक सल्लागार म्हणून कार्यरत होते. तर सौ. नीलू इंगळे या सारांश फाऊंडेशनच्या अध्यक्ष असून, सन २०२३ पासून त्या छावा मराठा युवा महासंघाच्या महिला आघाडीच्या महानगराध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत होत्या.
दोन्ही पदाधिकाऱ्यांना संघटनेतील कामाचा अनुभव असल्याने त्यांच्यावर सोपविण्यात आलेल्या नवीन जबाबदारीतून संघटनेच्या कार्याला अधिक बळ मिळण्याची अपेक्षा आहे. तसेच, त्यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील संघटनात्मक कामकाज अधिक प्रभावीपणे पुढे नेण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. या नियुक्त्यांबद्दल संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ॲड. राजेश पावसे आणि सौ. नीलू इंगळे यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.




















