
जळगाव मिरर / ३ नोव्हेंबर २०२२
राज्यात ठाकरे गटाची महाप्रबोधन यात्रा जळगाव जिल्ह्यात दाखल झाल्यानंतर धरणगाव येथे पहिलीच सभा मोठ्या जोशात झाली पण यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून असलेले युवासेनेचे राज्य विस्तारक शरद कोळी यांनी धरणगावातील महाप्रबोधन यात्रेत पालकमंत्र्यांसह बाळासाहेबांच्या शिवसेनेवर अतिशय खालच्या स्तरावर टिका केल्याच्या कारणावरून त्यांच्या विरोधात येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि , ठाकरे गटाची पक्षाची १ रोजी धरणगाव येथे सभा झाली यात सुषमा अंधारे यांच्यासोबत असलेले युवासेनेचे राज्य विस्तारक शरद कोळी यांनी अतिशय आक्रमक भाषण केले. त्यांनी आपल्या भाषणात शिंदे गटाच्या आमदारांवर अतिशय शेलक्या भाषेत टीका केली. याची दखल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी शरद कोळी यांना भाषण करण्यास बंदी घातली आहे. यानंतर त्यांच्या विरोधात धरणगाव पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यावेळी शरद कोळी यांनी आपल्या भाषणातून पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्यासह शिंदे सरकार आणि त्यांच्या मंत्री आणि सहकाऱ्यांवर अतिशय खालच्या स्तरावरून टीका केली होती. याच प्रकरणी त्यांच्या विरोधात धरणगाव पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात शिंदे गटाचे पदाधिकारी प्रभूदास जाधव यांनी धरणगाव पोलीस स्थानकात फिर्याद दिली.




















