
जळगाव मिरर । ९ नोव्हेबर २०२२
लॉटरी लागल्याचे सांगून कांचन आसाराम मासरे (वय २९, रा. योगेश्वर नगर) या महिलेची ५१ हजार १५० रुपयात ऑनलाईन फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कांचन मासरे यांना २७ ऑक्टोबर रोजी दुपारी एका अनोळखी क्रमांकावरून कॉल आला. तुम्हाला २५ लाखांची लॉटरी लागली असल्याचे सांगितले. हे खोटे असल्याचे समजून कांचन यांनी कॉल कट केला. मात्र पुन्हा दुसऱ्या क्रमांकावरून कॉल आला व व्हॉट्सअॅपवर कंपनीचे पॉम्प्लेट टाकल्याचे सांगितले. केबीसी असे नाव असल्याने कांचन यांचा समोरील व्यक्तीवर विश्वास बसला. त्यामुळे समोरील व्यक्ती सांगेल त्याप्रमाणे कांचन व त्यांचे भाऊ अजय बनवारी यांनी वेळोवेळी सुंदरम कुमार व गुड्डू कुमार यांच्या अकाऊंटवर ५१ हजारे १५० ऑनलाईन पाठविले. समोरील व्यक्ती काहीही कारण सांगून वारंवार पैशांची मागणी करीत होती. मात्र लॉटरीचे पैसे मिळत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांनी शनीपेठ पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यावरून मंगळवारी सुंदरम कुमार व गुहू कुमार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.





















