सध्या बरेच लोक वजन कमी करण्यासाठी बरंच वर्कआऊट आणि विविध व्यायामप्रकार यांचा रोजच्या दिनचर्येत समावेश करत असतात. इंटरनेटवरही वजन कमी करण्यासाठी अनेक उपाय शोधत असतात. पण आज आम्ही तुम्हाला काही अशा डाएट्सबद्दल सांगणार आहोत जी 2022 या वर्षात सर्वात जास्त ट्रेंडमध्ये होती. जर तुम्हीही सध्या वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर ही डाएट्स फॉलो करून पाहू शकता.
मेडिटेरेनिअन डाएट
मेडिटेरेनिअन डाएट मध्ये थोड्या ऑलिव्ह-ऑईलसह संपूर्णपणे प्लांट बेस डाएटचा समावेश असतो. या डाएटचा संपूर्ण फोकस केवळ ताजे अन्न खाण्यावर असतो. या डाएटमध्ये साधारणत: ताजी फळं, भाज्या, शेंगदाणे आणि धान्य यांचा समावेश असतो. त्यासह थोडे मासे आणि चिकन अथवा अंडी हेही असते. मात्र या मेडेटेरेनिअन डाएटमध्ये दुग्धजन्य पदार्थ, लाल अथवा प्रक्रिया केलेले मांस आणि गोड पदार्थ यांचे सेवन अतिशय कमी केले जाते. या डाएटमध्ये गाजर, कांदे, ब्रोकोली, केल, लसूण, झुकिनी, मशरूम, मटार आणि मिश्र भाज्यांचा समावेश असतो.
फ्लेक्सिटेरिअन डाएट
हे शाकाहारी व मांसाहारी डाएट यांचा मिश्र प्रकार आहे. हे डाएट पोषक तत्वांनी समृद्ध असल्यामुळे वजन कमी करण्यास मदत करते. त्यामध्ये शाकाहार अधिक व मांसाहार कमी करण्यावर भर दिला जातो. हे डाएट वजन कमी करण्यास मदत तर करतेच, त्याशिवाय हृदयरोग आणि टाइप -2 मधुमेहाचा धोकाही या डाएटमुळे कमी होतो.
पॅलिओ डाएट
यंदा, 2022 साली वजन कमी करणाऱ्या लोकांमध्ये पॅलिओ हे डाएट खूप प्रसिद्ध झाले. या डाएटमध्ये ताजी फळं आणि भाज्या, बियाणे आणि शेंगदाणे, लीन मीट, ओमेगा 3 फॅटी ॲसिडने समृद्ध असलेले मासे आणि प्रक्रिया न केलेले तेल यावर भर असतो. हे डाएट वजन कमी करण्यास, भूक कमी करण्यास, ब्लड शुगर ( रक्तातील साखरेची पातळी) आणि ब्लड प्रेशर (रक्तदाब) नियंत्रित करण्यास मदत करतो. मात्र हे डाएट पॉलो करताना (संपूर्ण) धान्य, शेंगा, दुग्धजन्य पदार्थ, प्रक्रिया केलेल पदार्थ, मीठ, प्रक्रिया केलेली साखर या पदार्थांचे सेवन करणे टाळावे.
