
जळगाव मिरर । २२ डिसेंबर २०२२
राज्यातील गुन्हेगारीत दिवसेदिवस वाढ होत असतांना दिसत आहे. त्यातच शुल्लक कारणाने कोण काय करून बसेल काहीच सांगता येत नाही. अशी एक धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. त्या घटनेचे कारण तुम्हाला थक्क करून सोडेल. पुण्यातील सिंहगड राेड परिसरात स्वाीट मार्टच्या दुकानात मिठाई घेण्यासाठी गेलेल्या दाेन तरुणांना काजू कतली मिठाई दुकानदाराने फुकट न दिल्याने त्यांनी थेट दुकानात गाेळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी पाेलिसांनी दाेन आराेपींचा शाेध घेऊन त्यांना अटक केल्याची माहिती बुधवारी दिली आहे.
पुणे येथील माणिकबाग परिसरातील सूरज ब्रह्मदेव मुंढे ( २३ ) यास अटक करण्यात आली असून त्याचा १७ वर्षाचा अल्पवयीन साथीदारास ताब्यात घेण्यात आले आहे, अशी माहिती सिंहगड राेड पाेलिस ठाण्याचे वरिष्ठ पाेलिस निरीक्षक शैलेश संखे यांनी दिली आहे. सदरची घटना १९ डिसेंबर राेजी दुपारी चार वाजता सिंहगड राेडवरील फुलपरी स्वीट माॅल याठिकाणी घडलेली असून त्याबाबत दुकान मालक जाेधाराम धिसाजी चाैधरी (वय-५०, रा.दत्तवाडी,पुणे) यांनी पाेलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.





















