जळगाव मिरर | १६ ऑक्टोबर २०२६
चाळीसगाव शहरातील लक्ष्मीनगर परिसरात भरदिवसा घरफोडी करून अज्ञात चोरट्याने सहा लाख रुपयांच्या रोकडसह सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण ६ लाख ४५ हजारांचा ऐवज चोरून नेल्याची घटना १४ ऑक्टोबरला दुपारी घडली होती. याप्रकरणी रोशन धरमचंद ताथेड (वय ४३) यांच्या फिर्यादीवरुन चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रोशन ताथेड यांचे गणेश क्रॉस रोड येथे वर्धमान बिल्डिंग मटेरियल बांधकाम साहित्य विक्रीचे दुकान आहे. १४ ऑक्टोबरला दुपारी तीन वाजेच्या सुमारास ते घरातून दुकानावर गेले. त्यानंतर त्यांच्या पत्नी राणी ताथेड या दुपारी ३.१५ वाजता घरी आल्यात. जेवण केल्यानंतर त्या ३.४५ वाजेच्या सुमारास घरातून बाहेर पडून समोरील सावित्रीबाई फुले महाविद्यालयात गेल्या होत्या. तर, दुपारी ४.२९ वाजता त्या घरी परतल्या असता घराच्या मुख्य दरवाजाचा कडीकोयंडा व कुलूप तुटलेले दिसले. घरात पाहणी केली असता बेडरूममधील लाकडी कपाटातील कपडे अस्ताव्यस्त पडलेले होते, तर कपाटाचे ड्रॉवर तोडलेले आढळले.
तपासणीदरम्यान बांधकाम साहित्य विक्रीतून मिळालेली सुमारे सहा लाखांची रोकड, १५ ग्रॅमचा सोन्याचा मोतीहार, पाच ग्रॅमची सोन्याची अंगठी तसेच चांदीची समई व दिवा असा एकूण ६ लाख ४५ हजारांचा ऐवज चोरीस गेल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास स.पो.नि. भरत चौधरी करत आहेत.



















