
जळगाव मिरर । २७ डिसेंबर २०२२
धुळ्याहून अमळनेरकडे जाणाऱ्या दुचाकीला भरधाव जाणाऱ्या कंटेनरने धडक दिली. २६ रोजी दुपारी १२ वाजता मंगरुळजवळ झालेल्या या अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याची आई गंभीर जखमी झाली.धुळे जिल्ह्यातील धाडरे येथील रहिवासी मनोहर बाळू पवार (वय २३) हा युवक आई कल्पनाबाईसोबत दुचाकीने (एम.एच.१८-बी.डब्ल्यू.३२४०) धुळ्याहून अमळनेरकडे जात होता. पुढे चालणाऱ्याने कंटेनरने (एम.एच.४६-ए.एफ.७८४७) अचानक वळण घेतल्याने, मनोहरची दुचाकी कंटेनरवर धडकली.
या अपघातात दुचाकीस्वार मनोहर पवारचा जागीच मृत्यू झाला. तर कल्पनाबाई गंभीर जखमी झाल्याने, त्यांना धुळे येथे शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे. याप्रकरणी मनोहरचा चुलतभाऊ समाधान कैलास पवार याने अमळनेर पोलिस स्टेशनला फिर्याद दिली. त्यानुसार कंटेनरचालक सुरज रामसिंग जाधव (रा.रणाईचे तांडा, ता.अमळनेर) याच्याविरुद्ध युवकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास हेडकॉन्स्टेबल हितेश चिंचोरे करत आहेत.




















