
जळगाव मिरर । ५ जानेवारी २०२३
महिनाभरापुर्वी जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी नदीच्या पाणथ्यावर जात तर अचानक मध्यरात्रीच्या सुमारास जळगावात फेरफटका मारीत जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी वाळूमाफियांचे डंपर जप्त केले होते. त्यानंतर वाळूमाफियामध्ये चांगलेच धाबे दणाणले होते. त्यानंतर आता धरणगाव तालुक्यातील दोन गोडावूनवर कारवाई केल्याने आता रेशन माफियांचेहि धाबे दणाणले आहे. जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी धरणगाव शहरातील दोन धान्य गोदामांवर छापा टाकून ते सील केले आहेत. बुधवारी दुपारी ही धडक कारवाई करण्यात आली.
धरणगाव शहरातील चोपडा रोडवरील दोन गोदामांवर बुधवारी दुपारी जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्या पथकाने अचानक छापा टाकला. एका गोदामावर पथक धडकल्यानंतर त्यांना गोदाम परिसरातील मोकळ्या जागेत तसेच गोदामातदेखील मोठ्या प्रमाणात धान्यसाठा आढळून आला.
पथकाने लागलीच गोदाम सील केले. त्यानंतर जिल्हाधिकारी मित्तल यांच्या पथकाने चोपडा रोडवरीलच दुसऱ्या गोदामावर धडक दिली. याठिकाणीदेखील मोठ्या प्रमाणात धान्य आढळून आले. दोन्ही गोदाम सील करण्यात आली आहेत. याआधीही यातील एका गोदामाची तपासणी झाली होती. धान्याच्या काळाबाजाराला आळा बसण्यासाठी तपासणी केली जात असून पारोळ्यानंतर धरणगाव येथेही जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई केली.




















