
धरणगाव : विनोद रोकडे
येथील सावता माळी समाज सुधारणा पंच मंडळाच्या वतीने सावित्रीबाई फुले जयंती निमित्त जाहीर व्याख्यानाचे आयोजन केले होते. याप्रसंगी प्रमुख व्याख्याते सामाजिक समरसता मंचचे प्रदेश सदस्य प्रा. आर. एन. महाजन यांनी सावित्रीबाई फुले यांनी तळागाळातील महिलांच्या विचार केला, त्यांना शिकवले, त्यांचा उद्धार केला. म्हणूनच त्या क्रांतीज्योती बनू शकल्या. या कार्यात त्यांना महात्मा ज्योतिबा फुले यांचे मार्गदर्शन व अनमोल सहकार्य लाभले.
पती-पत्नीचे नाते हे ज्योतिबा आणि सावित्री यांच्यासारखे असावे. ज्योतिबांनी सावित्री यांना महिला म्हणून कधीही खालच्या दर्जाची वागणूक दिले नाही. तर आपल्या बरोबरीचे स्थान देऊन त्यांच्या माध्यमातून महिला कशा शिकतील यासाठी प्रयत्न केलेत. ज्योतिबा सुद्धा सर्व समाजासाठी झटले आणि म्हणूनच ते महात्मा या पदवीपर्यंत पोहोचू शकले. आज सर्व समाजांनी या दांपत्याचा आदर्श घ्यायला पाहिजे, असे ठाम प्रतिपादन व्याख्याते प्राध्यापक आर. एन. महाजन यांनी केले. अध्यक्षीय भाषणात हभप भगवानदासजी महाराज यांनी फुले दांपत्याचा विचार आधुनिक जगाला तारणारा आहे, असे सांगितले. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष माऊली वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हभप महंत भगवानदास जी महाराज उपस्थित होते.
व्यासपीठावर मोठा माळीवाडा पंचमंडळ अध्यक्ष विठोबा माळी, लहान माळीवाडा पंचमंडळ अध्यक्ष रामकृष्ण महाजन त्याचप्रमाणे उपाध्यक्ष निंबाजी महाजन व शिवाजी देशमुख उपस्थित होते. व्याख्यान कार्यक्रमाप्रसंगी शहरातील समाजात काम करणारे गायरान मंचाच्या सदस्यांच्या सत्कार करण्यात आला. मा. नगराध्यक्षा पुष्पा महाजन, नगरसेविका सुरेखा महाजन, प्रा. कविता महाजन, संगीता माळी व स्थानिक महिलांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रस्तावना समाजाचे कोषाध्यक्ष व्ही. टी. माळी यांनी केले. आभार समाजाचे सचिव गोपाल माळी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समाजाचे ट्रस्टी ज्ञानेश्वर महाजन.डिगंबर महाजन. व्ही. टी. माळी, गोपाळ माळी, विजय महाजन, संजय महाजन, आर. डी. महाजन, सुकदेव महाजन. दशरथ महाजन, राजू महाजन, रामनाथ महाजन, मनोज महाजन व सर्व पंचमंडळाने मेहनत घेतली.




















