
जळगाव मिरर | ३ जुलै २०२६

अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा येथे लाकडाचे काम करत असताना ग्राइंडर मशीनवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या भीषण अपघातात ज्येष्ठ कारागीर देविदास लटकन सुतार (वय ७४) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. गुरुवार, दि. २ जुलै रोजी दुपारी सुमारे १२ वाजेच्या सुमारास ही हृदयद्रावक घटना घडली. या दुर्घटनेमुळे टाकरखेडा गावासह परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, देविदास सुतार हे नेहमीप्रमाणे आपल्या घरी लाकडाचे काम करत होते. काम सुरू असताना त्यांच्या हातातील ग्राइंडर मशीनवरील नियंत्रण अचानक सुटले. त्यामुळे मशीनचा धारदार भाग थेट त्यांच्या गळ्याला लागला. या अपघातात त्यांना गंभीर दुखापत झाली असून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला.
घटनेनंतर उपस्थित नागरिकांनी तातडीने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, गंभीर दुखापतीमुळे त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, मृतदेह शवविच्छेदनासाठी अमळनेर ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला आहे. पुढील आवश्यक कार्यवाही संबंधित यंत्रणेकडून करण्यात येत आहे.




















