
जळगाव मिरर | ३ जुलै २०२६

अकोला येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) कारवाईत अडकलेले मुद्रांक जिल्हाधिकारी किरण चौधरी यांच्या जळगावातील सीलबंद घराची गुरुवारी (दि. २ जुलै) एसीबीच्या नाशिक व जळगाव पथकाने संयुक्तपणे ‘इन-कॅमेरा’ झाडाझडती सुरू केली. दुपारपासून सुरू झालेली ही कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती. कारवाईदरम्यान पैशांची मोजणी करणारे मशीन तसेच मोठे खोके घटनास्थळी आणण्यात आल्याने पथकाच्या हाती मोठे घबाड लागल्याची चर्चा शहरात रंगली आहे. मात्र, याबाबत एसीबीकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, अकोला येथे लाच स्वीकारल्याच्या आरोपावरून एसीबीने मुद्रांक जिल्हाधिकारी किरण चौधरी यांच्यावर कारवाई केली होती. त्यानंतर जळगाव शहरातील साईप्रभा आर्केड अपार्टमेंटमधील त्यांच्या निवासस्थानाला एसीबीने सील केले होते. मात्र, त्याच रात्री काही व्यक्तींनी शिडीच्या साहाय्याने सीलबंद घरात प्रवेश करून साहित्य बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. या वेळी जिल्हापेठ पोलिसांनी दोघांना रंगेहात पकडून अटक केली होती. या घटनेमुळे हे प्रकरण राज्यभर चर्चेचा विषय ठरले होते. या पार्श्वभूमीवर एसीबीने पुन्हा घर सीलबंद करून तेथे कडक पोलीस बंदोबस्त ठेवला होता. अखेर गुरुवारी नाशिक आणि जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या आठ ते दहा अधिकाऱ्यांच्या संयुक्त पथकाने दुपारी सुमारे चार वाजल्यापासून घराची सखोल तपासणी सुरू केली.
कारवाईदरम्यान कमालीची गोपनीयता पाळण्यात आली. अपार्टमेंटमध्ये बाहेरील व्यक्तींना प्रवेश पूर्णपणे बंद करण्यात आला होता. तसेच माध्यमांच्या प्रतिनिधींनाही इमारतीत जाण्यास मज्जाव करण्यात आला. एसीबीचे अधिकारी घरातील कागदपत्रे, मौल्यवान वस्तू आणि इतर साहित्याची बारकाईने तपासणी करत असल्याचे समजते.
सायंकाळच्या सुमारास पैशांची मोजणी करणारे मशीन आणि मोठ्या आकाराचे अनेक खोके अपार्टमेंटमध्ये नेण्यात आल्याचे दिसून आले. त्यामुळे झाडाझडतीदरम्यान मोठ्या प्रमाणात रोकड, कागदपत्रे किंवा इतर महत्त्वाचे साहित्य हाती लागल्याची चर्चा सुरू झाली आहे. तथापि, कारवाई पूर्ण होईपर्यंत एसीबीकडून कोणतीही अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. सीलबंद घरात यापूर्वी घरफोडीचा प्रयत्न झाल्यामुळे यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून अपार्टमेंट परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. रात्री उशिरापर्यंत झाडाझडती सुरू असल्याने या कारवाईकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.




















