
जळगाव मिरर । ९ जानेवारी २०२३
शहरातील बजरंग बोगद्याजवळ कारच्या धडकेत पाच वर्षांचा बालक जखमी झाल्याची घटना घडली. या अपघात प्रकरणी कारचालक महिलेविरुद्ध शनिवारी जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
शहरातील वाघनगर येथे हेमंत रतिलाल भोई (वय-३४) हे कुटुंबासह वास्तव्यास आहेत. ५ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता हेमंत भोई हे त्यांचा मुलगा रोनित याच्यासोबत गणेश कॉलनी परिसरात बजरंग बोगद्याजवळ आले होते. यादरम्यान (एम.एच.१९ बी. जे. ५७००) या क्रमांकाच्या कारने रोनित यास धडक दिली.
या धडकेत रोनितच्या डोक्याला, कपाळावर, गुडघ्याजवळ, पोटावर गंभीर दुखापत झाली. या अपघातानंतर कार चालक न थांबता घटनास्थळावरून पसार झाले. मुलावर उपचारानंतर दोन दिवसांनंतर हेमंत भोई यांनी शनिवारी जिल्हापेठ पोलिसात तक्रार दिली. या तक्रारीवरून अपघातात कारणीभूत कारचालक महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल महेंद्र पाटील हे करीत आहे.




















