
जळगाव मिरर । २३ जानेवारी २०२३ ।
जिल्ह्यातील श्रध्दास्थान असलेल्या भुसावळ तालुक्यातील अट्रावल येथील मुंजोबाच्या यात्रेस सोमवार आजपासून प्रारंभ होत आहे. देवस्थानच्यावतीने यात्रेची परिपूर्ण तयारी झाली असून यात्रा स्थळी व्यावसायिकांनी दुकाने थाटण्यास सुरुवात केली आहे सुरक्षेच्या कारणावरून फैजपुर उपविभागीय पोलीस उपाधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे येथील पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर, एस.टीआगाराचे आगार प्रमुख दिलीप महाजन, वाहतूक अधीक्षक प्रमुख जितेंद्र जवंजाळ यांनी शुक्रवारी रात्री यात्रा स्थळाची पाहणी करत विश्वस्तांना सूचना केल्या आहेत.
गेल्या तीन वर्षानंतर कोरोनाच्या संसर्गानंतर या वर्षी प्रथमच यात्रा भरत असल्याने यात्रेत मोठी गर्दी राहणार असल्याने देवस्थान समितीने चोख व्यवस्था केली आहे. तालुक्यातील अट्रावल येथील प्रसिद्ध मुंजोबा मंदिर म्हणजे नवसाला पावणारा अशी भाविकांची श्रद्धा आहे. लगतच्या बऱ्हाणपूर जिल्ह्यासह जिल्ह्यातील भाविक यात्रेत हजेरी लावतात. माघ महिन्यातील सोमवार व शनिवार सह पोर्णिमेला ही यात्रा भरते. यावर्षी यात्रेचे पौर्णिमेसह पाच वार पडत आहेत यात्रेचे वार – २३ जानेवारी (सोमवार), २८जानेवारी (शनिवार), ३०जानेवारी (सोमवार) ,४फेब्रुवारी (शनिवार), ५फेब्रुवारी (पोर्णिमा)
गेल्या यात्रेत मुंजोबाला इच्छित मागणे मागितल्यानंतर त्याची कार्यसिद्धी होताच त्या कुटुंबाकडून मुंजोबाला यात्रेत मान देण्याची प्रथा आहे यात रोडगे, वरण ,भात व वांग्याच्या भाजीचे जेवण दिले जाते यात्रेत असे मान देणाऱ्या कुटुंबीयांची संख्या शेकडोने असल्याने यात्रा स्थळी जिकडे-तीकडे जेवणावळीच्या पंक्ती दिसून येतात.राज्य परिवहन महामंडळाकडून यावल, भुसावळ, फैजपूर, रावेर येथून एसटी बसेस सोडल्या जातात. येथील पोलीस ठाण्याकडून यात्रास्थळी पोलिसांचा चोख बंदोबस्त असतो यासह देवस्थानचे स्वयंसेवक बंदोबस्तासाठी तैनात केले जातात.व्यावसायिक दुकाने यात्रेत पूजा पत्री खेळणी उपहारगृहे आकाश पाळणे संसार उपयोगी वस्तू यासह विविध वस्तूंचे दुकाने लावलेले असतात.




















