जळगाव मिरर / २४ फेब्रुवारी २०२३ ।
स्वतःला वाघ म्हणणारे धमकीला काय घाबरता? मी वाघ आहे… मी वाघ आहे… असं संजय राऊत नेहमी म्हणतात, मग दात काढलेला वाघ आहे काय, अशा शब्दात पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत जळगाव जिल्हा परिषदेत संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमापूजन कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमानंतर गुलाबराव पत्रकारांशी बोलत होते.
गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, हे बघा एकवेळ पिक्चर लागून सात महिने झाल्यानंतर त्याला महत्त्व नसतं. गद्दार गद्दार हे ऐकून लोकही आता बोअर झाले आहेत. तुम्हाला काय मिळालंय, नाही मिळालंय, लोकांनी काय गद्दारी केली हे आता सगळं संपलंय. त्यांनी आता नवीन उभारीने पक्ष बांधला पाहिजे आणि आम्हाला चितपट करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. शेवटी निवडणुकीला आणि निवडून यायला महत्त्व आहे. तुम्ही तुमचे लोक निवडून आणा, आम्ही निवडून येण्याचा प्रयत्न करू. आम्हाला पाडण्याचा प्रयत्न करा, असं थेट आव्हानदेखील गुलाबरावांनी आदित्य ठाकरेंना दिलं.
