
जळगाव मिरर / २८ मार्च २०२३

जळगाव शहरात गेल्या काही दिवसापासून पोलिसांनी जिल्ह्यातील अनेक गुन्हेगार टोळ्याना हद्दपार केले आहे. त्यात आता पुन्हा शहरातील दोन गुन्हेगारांवर एमपीडीए कायद्याअंतर्गत स्थानबद्ध करण्यात आले आहे.
मिळालेली माहिती अशी कि , शहरातील एमआयडीसी पोलीस स्थानकाच्या हद्दीत असलेले तांबापुरामधील अजमेरी गल्लीतील रिजवान उर्फ काल्या गयासोद्दीन शेख आणि एमडीएस कॉलनीतील रितेश उर्फ चिच्या कृष्णा शिंदे याना स्थानबद्ध करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. धुळे शहर, जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहर, जिल्हापेठ, एमआयडीसी आदी पोलिस स्टेशनला दरोड्याचा प्रयत्न, जबरी चोरी, गंभीर दुखापत, विनयभंग, धार्मिक भावना दुखावणे, सरकारी नोकरावर हल्ला, चोरी, चोरीचा उद्देश, मारामारी, शस्त्र अधिनियम, असे एकूण 16 गुन्हे रितेश उर्फ चिच्या याच्याविरुद्ध दाखल आहेत. वेळोवेळी त्याच्याविरुद्ध प्रभावी प्रतिबंधात्मक कारवाई देखील करण्यात आली आहे.तर दुसरा रिजवान याच्याविरुद्ध जळगाव शहर, जिल्हापेठ, एमआयडीसी आदी पोलिस स्टेशनला दरोड्याचा प्रयत्न, जबरी चोरी, गंभीर दुखापत, सरकारी नोकरावर हल्ला, घरफोडी, चोरी, हद्दपार आदेशाचे उल्लंघन, शस्त्र अधिनियम असे एकूण 21 गुन्हे दाखल आहेत. रिजवान उर्फ काल्या याच्याविरुद्ध वेळोवेळी प्रभावी प्रतिबंधात्मक कारवाई देखील करण्यात आली आहे. त्याच्याविरुद्ध वेळोवेळी दाखल गुन्ह्यात त्याला अटक करण्यात आली आहे. न्यायालयातून जामीनावर सुटून बाहेर आल्यानंतर देखील त्याच्या सराईत गुन्हेगारी कारवाया सुरुच होत्या.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील, एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक जयपाल हिरे, सहायक पोलिस निरीक्षक मोरे, नीलेश गोसावी यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक फौजदार युनूस शेख इब्राहिम, हेड कॉन्स्टेबल सुनिल दामोदरे, जयंत चौधरी, ईश्वर पाटील, एमआयडीसी पोलिस स्टेशनचे सहायक फौजदार अतुल वंजारी, पोलिस नाईक सचिन पाटील, योगेश बारी आदींनी या कारवाईत सहभाग घेतला. रिजवान याची नागपूर मध्यवर्ती कारागृहात तर रितेश शिंदे याची अमरावती मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.




















