
अमळनेर : विक्की उत्तम जाधव

गरीब हातमजुराच्या घराला अचानक आग लागून संपूर्ण संसार जळून खाक झाल्याची घटना ८ रोजी सकाळी साडे आठ वाजेच्या सुमारास तालुक्यातील मंगरूळ येथे घडली. या कुटुंबाला तातडीची मदत मिळणे गरजेचे आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील मंगरूळ येथे सुरेश गंभीर भिल यांच्या पत्नी नबाबाई या सकाळी स्वयंपाक करत होत्या. मुलगा गणेश आणि सुनबाई बाहेर कामे उरकत होते. जवळच पाच महिन्यांची वैष्णवी खेळत होती. अचानक ठिणगी पडून घराने पेट घेतला. नबाबाईने पटकन नात वैष्णवीला उचलले आणि बाहेर पळाल्या. तोपर्यंत घरातील कपडे व सामानाला देखील आग लागली होती. गल्लीतील लोकांनी धावपळ करीत आग विझवण्याचा प्रयत्न केला परंतु घरातील अंथरूण, पांघरूण, कपडे, अन्न धान्य, भांडी सारे काही जळून खाक झाले होते. अंगावरील कपड्याव्यतिरिक्त एकही वस्तू घरात शिल्लक राहिली नाही. लहान टीव्ही, पंखा आदी उपयोगी इलेक्ट्रिक वस्तू देखील जळाल्या आहेत. तलाठी एम पी भावसार, ग्रामसेवक संजीव सैंदाणे यांनी पंचनामा केला. सुरेश भिल यांचे सुमारे दीड लाखाचे नुकसान झाले आहे. या कुटुंबाला आजच खायला आणि अंथरायला मारामार झाली आहे. शासनाने तात्काळ नुकसान भरपाई द्यावी आणि दानशूर व्यक्तींनी मदत करावी असे आवाहन गावकर्यांनी केले आहे.




















