
जळगाव मिरर | २४ ऑगस्ट २०२३
राज्यातील छत्रपती संभाजीनगर शहरातून मायलेकरांच्या नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. धनाच्या लोभापायी एका आईने आपल्या मैत्रिणीच्या सांगण्यावरून आपल्या २० वर्षाच्या पोटच्या मुलीला जाळण्याचा प्रयत्न केला. हे सर्व करून देखील तिचा मृत्यू न झाल्याने तिला घरातच ५ दिवस डांबून ठेवले. या प्रकरणावरून सदर आईविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील फुलेनगर परिसरात आई पार्वती हलमुख (वय ४०) हिच्यासोबत सुप्रिया दादासाहेब हलमुख (वय २०) हि तरूणी रहावयास असून या मुलीच्या वडिलांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले असल्याने ती आपल्या आई आणि भावासोबत राहते. १७ ऑगस्ट रोजी ती एका खासगी कंपनीत काम करून घरी परतून झोपी गेली असता मध्यरात्रीच्या सुमारास तिच्या आईने अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. तिने आरडाओरड केल्यावर भावाने तात्काळ धाव घेऊन आग विझवली. या घटनेमध्ये ती गंभीर जखमी झाली आहे. घटना घडल्यानंतरही पार्वती नावाच्या आईवर काहीच परिणाम झाला नाही.
तिने लेकीला घरातंच डांबून ठेवले होते. पण पाच दिवसानंतर आई घराच्या बाहेर गेल्याचा फायदा घेत सुप्रियाने थेट सिडको पोलिस स्टेशन गाठले आणि आईविरोधात तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी जादूटोणा करणाऱ्या महिलेवर आणि आरोपी आईवर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, पार्वतीने आपली मैत्रीण शकुंतला आहेर हिच्या सांगण्यावरून हे कृत्य केल्याची धक्कादायक माहिती पोलिसांनी केलेल्या तपासातून समोर आली आहे. शकुंतला ही जादूटोणा करून अनेकांना फसवण्याचे प्रकार करते. “तू जर तुझ्या मुलीला जिवंत जाळून मारले तर तुला चांगला धनलाभ होईल आणि तुझ्या मुलाचेसुद्धा चांगले होईल” असं शकुंतला हिने पार्वतीला सांगितले होते. तिच्या सांगण्यावरून पार्वतीने हे कृत्य केले पण सुदैवाने मुलगी वाचली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.





















