जळगाव मिरर | १८ नोव्हेंबर २०२६
रस्त्याच्या रखडलेल्या कामामुळे आणि प्रशासनाच्या ढिसाळ वाहतूक नियोजनामुळे एका निष्पाप जीवाला आपले प्राण गमवावे लागल्याची हृदयद्रावक घटना रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यात घडली आहे. खेळता खेळता फुगा गिळल्याने श्वास कोंडलेल्या 1 वर्ष 8 महिने (20 महिने) वयाच्या चिमुकल्याला घेऊन जाणारी रुग्णवाहिका अलिबाग-बेलकडे मार्गावरील वाहतूक कोंडीत तब्बल 1.5 ते 2 तास अडकून पडली. “माझ्या लेकराचा श्वास कोंडतोय, कोणीतरी रस्ता द्या हो…” असा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश हतबल आई-वडील करत राहिले; मात्र, पुढे जाण्यास इंचभरही जागा न मिळाल्याने उपचाराला उशीर झाला आणि त्या चिमुकल्याने आईच्या कुशीतच प्राण सोडले. आरांश सुशील ठाकूर असे या दुर्दैवी बालकाचे नाव असून, या घटनेमुळे संपूर्ण रायगड जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे.

अलिबाग तालुक्यातील बामणगाव येथील नाक्यावर भाजी विक्रीचा व्यवसाय करून उदरनिर्वाह करणाऱ्या सुशील ठाकूर यांना 2 मुले असून, आरांश हा त्यांचा धाकटा मुलगा होता. सोमवारी (16 नोव्हेंबर) दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास आरांश नेहमीप्रमाणे आपल्या घराच्या अंगणात खेळत होता. खेळता-खेळता त्याने अचानक एक फुगा तोंडात घातला आणि तो गिळला. हा फुगा थेट त्याच्या घशात जाऊन अडकल्याने काही क्षणांतच आरांशचा श्वास गुदमरू लागला. मुलाची ही गंभीर अवस्था पाहून घाबरलेल्या पालकांनी क्षणाचाही विलंब न करता त्याला तातडीने अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी नेण्यासाठी रुग्णवाहिका बोलावली.
रुग्णवाहिकेतून आरांशला रुग्णालयात नेत असताना बेलकडे ते अलिबाग दरम्यान रस्त्याचे काम सुरू असल्याने महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या भीषण वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका पूर्णपणे अडकून पडली. रुग्णवाहिकेचा सायरन सतत मोठमोठ्याने वाजत होता आणि आरांशचे आई-वडील पोटच्या गोळ्याला मांडीवर घेऊन रस्ता देण्यासाठी जीवाच्या आकांताने विनवण्या करत होते. मात्र, वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तिथे कोणतीही यंत्रणा नसल्याने आणि वाहनांना बाजूला सरकण्यास जागा नसल्याने रुग्णवाहिका जागची हलू शकली नाही.
तब्बल 1.5 ते 2 तासांच्या जीवघेण्या प्रतीक्षेनंतर कशीबशी रुग्णवाहिकेला वाट मिळाली. अखेर दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास रुग्णवाहिका अलिबाग जिल्हा सामान्य रुग्णालयात पोहोचली; परंतु डॉक्टरांनी तपासणी करताच चिमुकल्या आरांशला मृत घोषित केले. कालपर्यंत ज्या घरात चिमुकल्या आरांशच्या बोबड्या बोलांनी आणि खेळण्यांनी आनंद भरला होता, तिथे आज केवळ आई-वडिलांचा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश ऐकू येत आहे. एक सर्वसामान्य भाजी विक्रेते असलेल्या ठाकूर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेनंतर बामणगावसह संपूर्ण अलिबाग परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. रस्त्याचे काम सुरू असताना पर्यायी वाहतूक व्यवस्था का केली गेली नाही, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. या प्रकरणाची सखोल वैद्यकीय व प्रशासकीय चौकशी करून संबंधित रस्ता ठेकेदार आणि जबाबदार प्रशासकीय अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी आग्रही मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.





















