जळगाव मिरर | २५ ऑगस्ट २०२३
जळगाव जिल्ह्यातील जामनेरनजीक ढाब्यावर दरोड्याचा प्रयत्न करणाऱ्या आठ जणांना अटक करण्यात मुक्ताईनगर पोलिसांना यश आले आहे. जामनेर तालुक्यातील वाडी शिवारातील ढाब्यावर बुधवारी रात्री ८ चे सुमारास पांढऱ्या रंगाच्या चारचाकी वाहनातून ७ ते ८ अनोळखी इसम आले व त्यांनी ढाबा व्यवस्थापक गणेश रवींद्र बडगुजर याच्या डोक्याला पिस्तूल लावला. यानंतर तिथून मुक्ताईनगरकडे पळून जात असताना मुक्ताईनगर पोलिसांनी त्यांची कार अडवली आणि आठही जणांना पकडले. त्यांच्याकडून ६९ हजार रुपये रोख, चाळीस हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा, तीन जिवंत काडतूस, सुरा, सहा लाखांची चारचाकी कार, ४१ हजार रुपये किमतीचे सहा मोबाईल असा आठ लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
बडगुजर यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी भादंवि कलम ३९५, ३९७ व शस्त्र अधिनियम २५ व ३ नुसार गुन्हा दाखल केला आहे. उपनिरीक्षक सागर काळे तपास करीत आहेत. अटक करण्यात आलेल्यांमध्ये मुकेश फकीरा गणेश (४२), शेख भुरा शेख बशीर (३८, दोघे रा. शहापूर, जि. ब-हाणपूर), शेख शरीफ शेख सलीम (३५, रा. इच्छापूर), शाहरुख शहा चांद शहा (२०, रा. उज्जैन), अज्जू उर्फ अझरुद्दीन शेख अमीन (३६, रा अमीपुरा बऱ्हाणपूर), अंकुश तुळशीराम चव्हाण (३०, खापरखेडा), खजेंदर सिंग कुलबीर सिंग (४०, रा. लोधीपुरा बऱ्हाणपूर) आणि शेख नईम शेख कय्युम (४५, रा. शहापूर) यांचा समावेश आहे. पोलीस निरीक्षक नागेश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राहुल बोरकर पोहेकॉ. विनोद सोनवणे, संदीप खंडारे, धर्मेंद्र ठाकूर, संदीप वानखेडे, राहुल बेनवाल, संदीप धनगर, रवींद्र धनगर, मंगल सोळंके, अमोल जाधव यांनी हि कामगिरी बजावली.





















