अमळनेर : विक्की उत्तम जाधव
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशान्वये मागसवर्गीय ५६ जातींचे नोकरीविषयक हक्क हिरावून घेण्याच्या निर्णयाविरोधात येथील नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी थेट मदत, पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांच्या निवासस्थानी शेकडोच्या संख्येने धडकत मोर्चा काढला.
राष्ट्रीय नगरपालिका मजदूर महासंघ व भारतीय कर्मचारी महासंघातर्फे हा मोर्चा काढण्यात आला होता. कोर्टाने दिलेल्या आदेशामुळे मागासवर्गीय ५६ जातींचे नोकरीविषयक हक्क हिरावले जाणार असून विशिष्ट तीन जाती वगळून शासनाने निश्चित केलेल्या उर्वरित ५६ जातींना १९७२ पासून मे. लाड समितीच्या शिफारशीने सुरु असलेल्या वशीला वारसा पद्धतीवर गदा येणार आहे. ही वारसा पद्धती पूर्ववत सुरु ठेवण्याबाबत न्यायालयात शासनामार्फत पुनर्विचार याचिका दाखल करण्यासाठी मंत्री अनिल पाटलांमार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यात आले.