
जळगाव मिरर | २५ मे २०२६
एमआयडीसी परिसरातील शासनाच्या वखार महामंडळाच्या छताचे पत्रे बदलविण्याचे काम सुरू असताना २० फुटांवरून खाली पडल्याने एका परप्रांतीय मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. अब्दुल खान विक्रोमोद्दीन (वय १९, रा. इदोरी, ता. समयपुर, जि. गाझियाबाद, उत्तरप्रदेश, ह.मु. कुसुंबा, ता. जळगाव) असे मृत मजुराचे नाव असून, या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एमआयडीसी परिसरातील शासनाच्या वखार महामंडळाच्या इमारतीच्या छतावरील जुने पत्रे बदलून नवीन पत्रे बसविण्याचे कंत्राट पुणे येथील साई कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आले होते. संबंधित कंपनीचे मजूर छतावरील काम करीत होते. शुक्रवारी सकाळी उष्णतेचा त्रास होण्याची शक्यता लक्षात घेऊन काही मजुरांनी सुपरवायझर येण्यापूर्वीच काम सुरू करण्याचा निर्णय घेतला. सकाळी सुमारे सात वाजेच्या सुमारास अब्दुल खान विक्रोमोद्दीन याच्यासह काही मजूर छतावर चढून पत्रे बदलविण्याचे काम करीत होते.
दरम्यान, काम सुरू असताना अब्दुल खान याचा अचानक तोल जाऊन तो सुमारे २० फुटांवरून खाली कोसळला. या अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. घटनेनंतर सहकारी मजुरांनी त्याला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरू असताना दुपारच्या सुमारास त्याची प्राणज्योत मालवली.
दरम्यान, संबंधित कंत्राटदार कंपनीकडून कामगारांसाठी सेफ्टी बेल्टसह आवश्यक सुरक्षा साहित्य उपलब्ध करून देण्यात आले होते, अशी माहिती समोर आली आहे. मात्र, सुपरवायझर येण्यापूर्वीच अब्दुल खान याने सेफ्टी बेल्टचा वापर न करता काम सुरू केल्याने हा अपघात घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, अब्दुल खान यांच्या मृत्यूची माहिती नातेवाईकांना कळविण्यात आल्यानंतर ते तातडीने जळगावात दाखल झाले. रविवारी दुपारी शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मृतदेह उत्तरप्रदेशला नेण्यासाठी नातेवाईक रवाना झाले.





















