
जळगाव मिरर | २४ मे २०२६
तालुक्यातील एका गावात उकाड्यामुळे घराचा दरवाजा उघडा ठेवून झोपलेल्या महिलेच्या घरात घुसून तिच्यासोबत अश्लील वर्तन करत विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी संशयित म्हणून विश्वास मुकेश भिल याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील एका गावात राहणारी २४ वर्षीय महिला २२ मे रोजी रात्री उकाडा असल्याने आपल्या मुलासोबत घरात झोपली होती. उष्णतेमुळे तिने घराचा दरवाजा उघडाच ठेवला होता. दरम्यान, २२ मे रोजी पहाटे सुमारे ४ वाजेच्या सुमारास संशयित विश्वास भिल याने महिलेच्या घरात प्रवेश केला.
घरात शिरल्यानंतर संशयिताने महिलेसोबत अश्लील वर्तन करत तिचा विनयभंग केला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे महिला घाबरून गेली. त्यानंतर संशयित घटनास्थळावरून पसार झाला. घटनेनंतर पीडित महिलेने एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. तिच्या फिर्यादीवरून संशयित विश्वास मुकेश भिल याच्याविरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अधिकारी पाटील करीत आहेत.






















