जळगाव : प्रतिनिधी
शहरातील हरीओम नगरमधील रहिवासी असलेल्या हरविलेल्या इसमाचा आज संशसास्पद अवस्थेत मृतदेह आज आढळून आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, आज दुपारी आसोदा येथील रेल्वे गेट जवळच्या एका शेतात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला. या प्रकरणी पोलिसांनी चौकशी केली असता संबंधीत मृतदेह हा मिसींगची नोंद करण्यात आलेल्या व्यक्तीचा असल्याचे दिसून आले. शहरातील हरीओम नगरमध्ये असलेल्या वाणी मंगल कार्यालयाच्या जवळ असलेल्या किशोर विनायक पाटील ( वय ३९) याचा हा मृतदेह असल्याचे तपासात दिसून आले. ते काल दुपारपासून कुणालाही न सांगता घरातून निघून गेल्याने त्यांची पत्नी दीपमाला किशोर पाटील यांनी काल शनिपेठ पोलीस स्थानकात मिसिंगची नोंद केली होती. यानंतर आज हा मृतदेह आढळून आला. सदर मृतदेह या संशयास्पद स्थितीत आढळून आल्याने हा घातपाताचा प्रकार असल्याची शक्यता देखील असून पोलीस याच दिशेने तपास करत आहेत. या संदर्भात शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा शनिपेठ पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.




















