
जळगाव मिरर | २१ सप्टेंबर २०२३
शिर्डीतील एका जावयाने धारदार शस्त्राने वार करत पत्नी, मेहुणा व सासूचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. काल मध्यरात्री शिर्डीच्या सावळीविहीर गावात ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, पत्नी माहेरी राहत होती. अशात काल मध्यरात्री जावयाने पत्नीच्या घरी जात सासरच्यांवर अचानक धारदार शस्त्राने हल्ला केला. यात तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर, जावयाच्या हल्ल्यात सासरे आणि मेहुणी गंभीर जखमी झाले आहे.
कौटुंबिक वादातून जावयाने हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. सुरेश निकम असे आरोपी जावयाचे नाव आहे. हल्ल्यानंतर आरोपी सुरेश फरार झाला होता. त्याच्या हल्ल्यात पत्नी वर्षा सुरेश निकम (वय 24 वर्षे), मेहुणा रोहित चांगदेव गायकवाड (25 वर्षे) आजे सासू हिराबाई द्रौपद गायकवाड (70 वर्षे) यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे शिर्डी हादरली आहे.
शिर्डीच्या सावळीविहीर गावात राहणाऱ्या आरोपी सुरेश निकम याचा आपल्या पत्नीसोबत आणि तिच्या माहेरच्या मंडळीशी अनेक वर्षांपासून वाद सुरु होता. पत्नी माहेरी राहत असल्याने पती-पत्नीमध्ये वाद असल्याची माहिती आहे. या वादातूनच आरोपी सुरेशने हा हल्ला केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. तर, मृत वर्षा सुरेश निकम यांची भावजई श्वेता गायकवाड यांनी घटनेबाबत सांगितले की, रात्री अचानक आरोपी सुरेश निकम आले. दरवाजा उघडल्यानंतर लगेच वार करण्यास सुरूवात केली. पाच ते दहा मिनिटात सहा जणांवर वार केल्यानंतर सुरेश पळून गेला. आरोपी सुरेशला लवकरात लवकर शिक्षा झाली पाहीजे, अशी मागणीही त्यांनी केली.






















