
जळगाव मिरर | २३ सप्टेंबर २०२३
नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंबोली येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पहिलीत शिकत असलेल्या सहावर्षीय विद्यार्थिनीचा शाळेच्या मधल्या सुट्टीत डबा खात असताना मृत्यू झाला.
लहानपणापासून असलेल्या अल्सरच्या आजाराने तिचा बळी गेल्याचे शवविच्छेदन अहवालावरून स्पष्ट झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पूर्वा विलास गवते, असे तिचे नाव आहे. ती बुधवारी सकाळी शाळेत गेली होती. दुपारी १२:३० च्या सुमारास मधल्या सुट्टीत डबा खाण्यासाठी सर्व विद्यार्थिनी एकत्र बसल्या असताना, तिच्या पोटात दुखू लागले. तिला उलटीही झाली.
काही वेळातच ती बेशुद्धही पडली. रुग्णवाहिकेचा चालक नसल्याने, खासगी वाहनाने त्र्यंबकच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तिथून जिल्हा रुग्णालयात हलविले. वैद्यकीय अधिकारी डॉ. जाधव यांनी तिला मृत घोषित केले.






















