
जळगाव मिरर | १७ जून २०२४
पाचोरा शहरातील देशमुखवाडी भागातील रहिवासी चेतन हजारे (२९) याचे कर्तव्यावर असताना हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्याच्यावर पाचोरा येथे सोमवारी सकाळी १० वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, चेतन प्रकाश हजारे हा भारतीय सैन्यात बीएसएफमध्ये १० वर्षांपासून कार्यरत होता. दि. १५ जून रोजी रात्री १० वाजता त्यास हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यातच त्याचे निधन झाले. या निधनाची वार्ता परिवारास रविवार सकाळी ११ वाजता कळताच परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला. पाचोरा शहरावर शोककळा पसरली.
सीमा सुरक्षा दलात गेल्या दहा वर्षांपासून चेतन हा देशसेवा करीत होता. त्याचा विवाह झाल्यानंतर चेतन यास मिझोराम येथील सीमावर्ती भागात सेवा देण्यात आली. शनिवारी त्यास अचानक छातीत वेदना होऊ लागल्या. तत्काळ त्यास मिलिटरी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्याची प्राणज्योत मालवली. चेतनचे पार्थिव मिझोरामच्या ऐझवाल शहरातून इंदोर येथे विमानाने आणण्यात येत आहे. इंदूरहून लष्कराच्या वाहनाने १७ रोजी सकाळी ६ वाजता पाचोरा येथे आणले जाणार आहे. १० वाजता शासकीय इतमामात वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुले, बहीण असा परिवार आहे.





















