
जळगाव मिरर | ३० जून २०२४
राज्यातील अनेक ठिकाणी धक्कादायक घटना घडत असतांना नुकतेच चंदपूर जिल्ह्यातून एक थरारक घटनेची माहिती समोर आली आहे. एका आईने आपल्या अवघ्या ९ महिन्यांच्या बाळाला विष पाजून आईने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना वरोरा तालुक्यातील शेगाव या गावात घडली. पल्लवी मितेश पारोधे (२७) असे मृत महिलेचे नाव आहे. तिने आत्महत्येपूर्वी तिच्या स्मित नामक चिमुकल्याला विष दिल्याचे निष्पन्न झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, त्या मुलाला चंद्रपुरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. वरोरा तालुक्यातील शेगाव येथील मितेश पारोधे यांचे दोन वर्षांपूर्वी पल्लवी हिच्यासोबत लग्न झाले. त्यांना ९ महिन्याचा स्मित नामक मुलगा आहे.
वरोरा तालुक्यातील शेगाव बु. येथे मितेश पारोधे याचे कृषी केंद्र आहे. २ वर्षांपूर्वी यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव येथील पल्लवी ढोकेसोबत त्याचे लग्न झाले होते. ही घटना शुक्रवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास उघड झाली. मात्र आपल्या मुलीने आत्महत्या केली नसून सासरची मंडळी पैशांसाठी वारंवार त्रास देत असल्याचा आरोप करत पल्लवीचे वडील विनोद श्रीहरी ढोके यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. गुन्हा दाखल करत मृत पल्लवी हिचा पती मितेश पारोधे व दिर रितेश पारोधेला अटक केली आहे.






















