
जळगाव मिरर | १ जुलै २०२४
राज्यातील अनेक जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरु असून कोकणातील रत्नागिरीमध्ये महाकाय मगर रस्त्यावर दिसून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. चिपळूण शहरातील चिंचनाका परिसरात महाकाय मगर आढळली आहे. याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मगरींच्या वावराचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित होत आहे. महाकाय मगरी थेट नागरी वस्तीत आढळत असल्याने नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या मगरीचा रस्त्यावर वावर सुरू असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. रविवारी रात्री ही महाकाय मगर रस्त्यावर दिसून आल्यान प्रत्यक्षदर्शी मात्र घाबरुन गेले होते. प्रशासनाने मगरी नदीपात्र सोडून शहरात पोहोचणार नाहीत याची काळजी घेण्यासाठी कार्यवाही करण्याची मागणी देखील केली जात आहे. तसेच ही मगर पाहून रस्त्यावरून जाणाऱ्या वाहन चालकांची देखील चांगलीच बोबडी वळली. चिपळूण शहरातून वाहणाऱ्या शिव नदीत मगरींचा वावर प्रचंड आहे. पावसाळ्यात अनेकदा या मगरी शहरात मानवी वस्तीमध्ये वावरता दिसून येत असतात. प्रत्येक पावसाळ्यात नदीपात्र ओव्हर फ्लो झाल्यानंतर या मगरी रस्त्यावर आणि मानवी वस्तीत शिरतात. सध्या रत्नागिरीमध्ये चांगलाच पाऊस सुरू आहे. परिणामी थेट रस्त्यावरच या मगरीचा वावर दिसून आला.





















