
जळगाव मिरर | १० जुलै २०२४
राज्यातील अनेक ठिकाणी अल्पवयीन मुलीसह विवाहीतेवर विनयभंग व अत्याचाराच्या घटना घडत असतांना नुकतेच एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. नाशिक शहरातील सिडको परिसरातील एका नामांकित महाविद्यालयात शिकणाऱ्या २२ वर्षीय युवतीच्या तोंडावर गुंगीच्या औषधाचा स्प्रे मारून तिला मारहाण करीत तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडितेच्या परिचित युवकाने आपल्या मित्र व मैत्रिणीच्या संगनमताने हा प्रकार केला असून, पीडितेला डांबून ठेवत काढण्यात आलेले अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत युवतीला ब्लॅकमेल करण्यात आले आहे. फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर टाकण्याची धमकी देत युवतीकडून ४५ हजारांच्या रोकडसह कानातील सोन्याचे टॉप्स भामट्यांनी उकळले आहेत. पीडितेच्या तक्रारीनुसार अंबड पोलीस ठाण्यात बलात्कारासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय परदेशी व त्याचे दोन मित्र आणि एक अनोळखी मैत्रीण अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. सिडकोतील पीडित युवती दि. ४ मार्च रोजी नेहमीप्रमाणे महाविद्यालयात गेली होती. ती वर्गात गेली त्यावेळी संशयित विजय परदेशी याच्यासह त्याचे दोन मित्र आणि एक मैत्रीण तेथे उपस्थित होती. युवती आपल्या बाकावर जाऊन बसली असताना एकाने तिच्या तोंडावर गुंगीच्या औषधाचा स्प्रे फवारल्याने ती बेशुद्ध झाली. संशयितानी तिला उचलत एका वाहनातून अज्ञातस्थळी नेले. त्या ठिकाणी मारहाण करीत शारीरिक अत्याचार करण्यात आल्याचे पीडितेने फिर्यादीत म्हटले आहे.
संशयितांकडून या सर्व प्रकाराचे छायाचित्रण करण्यात आले, तसेच छायाचित्रेही काढण्यात आली. काही दिवसांपूर्वी युवतीच्या मोबाइलवर ते अश्लील फोटो पाठविण्यात आले. तसेच ती छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत संशयितांनी तिच्याकडे पैशांची मागणी केली. बदनामीच्या भीतीने युवतीने ४५ हजार रुपये रोख व तीन ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातले संशयिताच्या हवाली केले. मात्र, संशयितांकडून मागणी वाढल्याने युवतीने पोलिसांत धाव घेतली असून, तक्रार प्राप्त होताच पोलीस दप्तरी या घटनेची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास उपनिरीक्षक सविता उंडे करीत आहेत.






















