जळगाव मिरर | ७ ऑगस्ट २०२४
कर्जाला कंटाळून दशरथ भीमराव तांदळे (वय ५४) या शेतकऱ्याने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना मंगळवारी ६ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता उघडकीस आली. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, जळगाव तालुक्यातील दापोरा येथे दशरथ तांदळे हे आपल्या परिवारासह वास्तव्यास होते. शेती करून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्यांनी शेतीसाठी कर्ज काढले होते. हे कर्ज फेडण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून विवंचनेत होते. त्या नैराश्येतून त्यांनी मंगळवार दि. ६ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. कुटुंबियांना समजतात त्यांनी तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय जळगाव या ठिकाणी दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. रेणुका भंगाळे यांनी त्यांना मयत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी मन हेलावणारा आक्रोश केला. तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.