जळगाव मिरर | ११ ऑगस्ट २०२४
जळगाव शहरातून गेल्या काही महिन्यापासून अनेक अल्पवयीन मुलीना पळवून नेल्याच्या अनेक घटना उघडकीस येत असतांना नुकतेच रामानंद नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून एक तर एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून दोन अशा एकूण तीन अल्पवयीन मुलींना कोणीतरी फूस लावून पळवून नेले. या घटना शुक्रवारी (९ ऑगस्ट) उघडकीस आल्यानंतर मुलींच्या कुटुंबीयांनी पोलिसात फिर्याद दिली. यातील एका मुलीचे १८ वर्षे वय पूर्ण होण्यास सहा दिवसच शिल्लक आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणारी १५ वर्षीय तर दुसऱ्या घटनेत १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तींनी फूस लावून पळवून नेले. तर तिसऱ्या घटनेत रामानंद नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून १७ वर्षे ११ महिने २४ दिवस वय असलेल्या अल्पवयीन मुलीला तिची आई घरकाम करण्यासाठी बाहेर गेलेली असताना त्याच परिसरात राहणाऱ्या तरुणाने फूस लावून पळवून नेले.कुटुंबीयांनी संबंधित पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून एमआयडीसी व रामानंद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.