जळगाव : प्रतिनिधी
विधानसभेची निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतशी उमेदवारांमध्ये प्रचाराच्या माध्यमातून चुरस बघायला मिळत आहे. प्रत्येक उमेदवार नागरिकांसमोर आपण केलल्या विकास कामांचा आढावा देत आहे, तसेच भविष्यकालीन योजना आणि आश्वासनांपर्यंत सर्व गोष्टींचा समावेश आहे. अशा परिस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट व महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार जयश्री सुनील महाजन या त्यांच्या स्वच्छ प्रतिमेमुळे आणि संयमी राजकारणामुळे तसेच त्यांच्या जाहीरनाम्यातील सर्वसमावेशक मुद्द्यांमुळे सर्वांपेक्षा वेगळ्या ठरत आहेत.
जयश्री महाजन यांच्या महापौर पदाच्या कार्यकाळात शहराच्या विकासाला गती मिळाली होती. त्यांनी मूलभूत सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी केलेले प्रयत्न तसेच जळगावच्या महापालिकेची कर्जातून केलेली सुटका व त्यामुळे शहराच्या आर्थिक विकासात झालेली वाढ आजही नागरिकांच्या लक्षात आहे. त्यांच्या या कार्याची जणू उजळणी नागरिकांना त्यांच्या प्रचार दौऱ्याच्या निमित्ताने होत आहे. शहरातील नागरिकांसोबत असलेला त्यांचा जनसंपर्क, त्यामुळे ठिकठिकाणी मिळणारा प्रतिसाद पाहता, शहरातील नागरिक त्यांच्याबद्दल कार्याबद्दल कौतुकाचे उद्गार काढत असून, आजवर त्यांनी केलेल्या स्वच्छ राजकारणाला लोकांकडून जोरदार पाठिंबा मिळत आहे.
जयश्री महाजन यांचा प्रचार दौरा शहरातील विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात पार पडला. सेंट टेरेसा हायस्कूलसमोर, नेहरू नगर परिसर, मोहरी रोड येथील वैद्यकीय हॉस्पिटल परिसर, शारदा कॉलेज परिसर, शिरसोली रोड, नेहरू नगर परिसर, रविंद्र नगर, नूतन वर्षा कॉलनी, चैत्रबन कॉलनी येथे त्यांनी मतदारांशी संवाद साधला. त्यांनी नागरिकांच्या समस्या आणि अपेक्षा जाणून घेतल्या आणि त्या पूर्ण करण्यासाठी संकल्पित असल्याचे सांगितले.
जयश्री महाजन यांच्या प्रचार रॅलीत महाविकास आघाडीचे नेते, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांना साथ देत आहेत. या प्रचार दौऱ्यातील उत्साह आणि नागरिकांचा प्रतिसाद पाहता, जयश्री महाजन यांची स्वच्छ प्रतिमा शहराला विकासाची नवसंजीवनी देईल, असा आशावाद जळगावकरांकडून व्यक्त होत आहे.